You are currently viewing पुस्तकांचा लळा लावताना…!!

पुस्तकांचा लळा लावताना…!!

पुस्तक म्हटलं की मुलांना गोष्टी गाणी आठवतात की प्रश्न आणि परीक्षा??? पुस्तकातलं काहीतरी वाचायचं  असतं आणि नंतर ते टेस्ट मध्ये, परीक्षेत पाठ करून लिहायचं असत एवढाच संबंध आपण पुस्तकांसोबत घालून दिला आहे का???

अभ्यासक्रमाशिवाय पण अशी पुस्तक आहेत ज्यात गोष्टी आहेत, रंगीबेरंगी चित्र आहेत, एक वेगळी प्राण्यांची, जादूची, रोबोची दुनिया आहे हे मुलांना पट‍वण्यात आपण यशस्वी झालो आहोत का??? अवांतर वाचन, त्या वाचनातून मुलाने आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर निर्माण केलेली दुनिया याच अप्रूप आपल्याला आहे का??

शिक्षणासाठी आजकाल ऑडिओ , विडियो, प्रतिकृती (models) अशी वेगवेगळी माध्यम आज आपल्याला उपलब्ध आहेत. विविध संकल्पना शिकताना त्यांचा वापर नक्की केला गेला पाहिजे. मात्र शिक्षणातील माहितीवजा अभ्यासक्रम आणि पुस्तकांमधून मिळणारी सृजनता यातील मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे. माहिती साठवून ठेवण्यासाठी खूप सारी gadgets आज आपल्या सेवेसाठी आहेत. मात्र मुलांना आपण माहिती साठवून ठेवणारी गोदामं करण्यापेक्षा की त्यांच्या कल्पनाशक्तीला त्यांच्या नैसर्गिक उर्मीचे पंख देऊन त्यांना त्यांच्या अवकाशात मनसोक्त विहार करण्यास तयार करणे आज जास्त महत्त्वाचे आहे. 

हे धर वाच पुस्तक आस म्हटल्यावर मुल लगेच पुस्तक वाचायला घेत का हो??  अजिबात नाही. हल्ली तर घरात मोठेच कमी प्रमाणात वाचत असल्याने मुलांना पुस्तकांबद्दल अजिबात आस्था नाही. त्यांना गोडी  लावायची झाली तर ती  कशी लागेल?? असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. तर पुस्तक वाचायला लागण्याआधी ही पुस्तक म्हणजे आपल्या घरातली अतिशय महत्त्वाची अशी काहीतरी गोष्ट आहे हे त्यांना जाणवल गेलं पाहिजे. घरात त्यांच्या नजरेला पडेल अशा प्रत्येक ठिकाणी पुस्तक उपलब्ध असल पाहिजे. त्यांना आजकाल किचन पासून अंथरुणात पडेपर्यंत आई बाबांच्या हातात मोबाइल दिसतो. आई बाबा इतका तो मोबाइल जवळ ठेवतात म्हणजे त्यात काहीतरी खास आहे हे मुलांनी कधीच ओळखलेलं आहे. तेच पुस्तकांच्या बाबतीत आपल्याकडून घडत का?? घरात अगदी जेवणाच्या टेबल पासून कपाटात, हॉलमध्ये, सोफ्यावर पुस्तक त्यांच्या नजरेत येतात का??? आई बाबा वाचण्यात गुंग झालेले त्यांनी पाहीलेत का?? नाही. मग त्यांना का पुस्तकांबद्दल आत्मीयता वाटेल???

तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यांच्या नजरेसमोर सतत पुस्तक आणि पुस्तक वाचणारी माणसं ठेवावी लागतील. ज्या प्रमाणात वेगवेगळ्या स्क्रीन त्यांना सतत आजूबाजूला दिसतात तशी वेगवेगळी पुस्तक त्यांना दिसायला हवीत. एकदा पुस्तक घरात आली की ती वाच असा आग्रह अजिबात करायचा नाही. घरभर अशी पुस्तक दिसल्यावर एक दोन दिवसातच मुलांना त्या बद्दल कुतुहल वाटायलाच लागतं. एकदा का मुलांना पुस्तकांबद्दल जिव्हाळा आणि औत्सुक्य वाटायला लागले की त्यांच्यात वाचनाची आवड सहजपणे निर्माण होते. मात्र मुलांचा कल कोणत्या बाजूला आहे, तशा प्रकारची पुस्तके त्यांना मिळवून देणे हे आपले कौशल्य आहे. वाचन संस्कृती, वाचनाचा छंद या अशा वजनदार शब्दाभोवती वाचन फिरत न राहता ते सहजपणे आपल्या आयुष्याचा भाग व्हावे यासाठी आपल्यास मनःपूर्वक शुभेच्छा!!!     

This Post Has 3 Comments

  1. Nilesh Gosavi

    खूप सुंदर संकल्पना.. खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा..

  2. sanjeet

    आयडिया मस्त अहे… वाचन ही गोष्ट काळानुसार मागे पडायला लागली आहे असच म्हणाव लागेल कारण लोकं एव्हढी बिझी झालेत की स्वतःला वेळ पुरत नाही असं सांगायची वेळ येतेय. पण वेळेच नियोजन नसल्याने असं होतय हे कोणाच्याच लक्ष्यात येत नाही आणि वेळेच नियोजन करायच म्हणल तरी त्याला वेळ नसतो. आता लोक ऑनलाइन पॉडकास्ट ऐकण पसंत करतायत पन त्यात तेव्हढ हरवता येत नाही जेव्हढ वाचन करून हे कस आणि कोण समजावणार. जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा वाचताना काही लोक रडायला आणि काही लोक हसायला लागतात. एखादी कथा वाचत असताना आपण तिथल्या जीवनाची, वातावरणाची कल्पना करू लागतो. पुस्तकातील कथेच्या नायकाने काही चांगले केले तर आपण स्वतः ते चांगल कार्य केल्याची कल्पना करू लागतो. खरं तर ही भावना आपल्याला तणावापासून मुक्त करते. त्यामुळे, आपल्या मेंदूचे कार्य आणि आयुर्मान वाढण्यास मदत होते. वाचनाच्या सवयीमुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वाचन करणे खूप गरजेचे आहे.

Leave a Reply