पुस्तकांची निवड करताना किंवा खरेदी करताना काही मुद्दे लक्षात घेणे महत्त्वाचे असते. केवळ पुस्तक छान आहे, महाग आहे, सगळेजण हेच घेतात म्हणून खरेदी करून चालत नाही.
स्वभावतः प्रत्येक मुल वेगळे असते. त्याच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. पुस्तकांच्या बाबतीतलं वेगळेपण सांगायच तर काहींना शब्द आवडतात, काहींना अंक तर बऱ्याच जणांना चित्रं.
मूलं कोणत्या वयाची आहेत यावरूनही सर्वसाधारणपणे पुस्तकांचे वर्गीकरण केले जाते. परंतु सध्याच्या काळात बऱ्याच मुलांची दोन वर्षे कोविडमध्ये गेलेली असल्याने मुलांच्या वाचनाच्या, समजून घेण्याच्या क्षमतेत बऱ्याच अंशी घट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने माझे मुल साधारण कोणत्या पातळीवर आहे याची जाणीव ठेऊन त्या प्रमाणे पुस्तके निवडावीत.
वाचनगती कमी असलेल्या किंवा अजिबात वाचनाची आवड नसलेल्या मुलांना आधी पुस्तकांचा लळा लावणे जास्त महत्वाचे आहे. त्या साठी केवळ पुस्तके खरेदी करून न देता त्यांच्यासोबत बसून ती वाचण्यासाठी त्यांना मदत करणे, पुस्तके खूप छान असतात ही भावना त्यांच्या मनात जागृत करणे अधिक महत्वाचे असते. आणि अर्थात त्यासाठी पालकांनी त्यासाठी आपला वेळ गुंतवणे अपरिहार्य आहे.
बऱ्याचदा काही कारणाने मुलांचे शिक्षणाचे माध्यम बदलले जाते. मराठीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून मराठी. अशा वेळी त्याच्या वयापेक्षा कमी वयोगटातील नवीन माध्यमातील भाषेनुसार पुस्तके निवडावीत. याचा खूप फायदा मुलांना होतो. शब्द वाचन जमू लागल्याने निर्माण होणार आत्मविश्वास नव्या माध्यमाशी जुळवून घेताना सगळ्यात जास्त महत्वाचा असतो जो त्यांना हसत खेळत मिळतो.
विविध विषयांवरील पुस्तके मुलांच्या समोर आल्यास ती त्यांच्या मूड नुसार ती चाळायला सुरवात करतात. त्यांना पुस्तकांतील वैविध्य दाखवून द्या.
केवळ एकाच भाषेच्या पुस्तकांचा आग्रह न धरता त्याला जी भाषा काहीशी कठीण जात असेल त्यातली सोपी, लहान अशी पुस्तके त्यांना नक्की त्या. कोणत्याही भाषेतील शब्दसंपदा केवळ पुस्तकांमुळे आपल्याला लाभते.
विषयानुसार वेगवेगळे ग्रुप वेबसाइट वर केले गेलेले आहेत. विषयांच्या आवडीनुसार तुम्ही पुस्तके निवडू शकता. पुस्तकावर क्लिक केल्यावर त्याची माहिती तुम्हाला मिळेल. पुस्तकाचे लेखक, असल्यास अनुवादक, चित्रे कुणाची आहेत ती माहिती. त्याचबरोबर पुस्तकची साइज जी इंचात दिलेली आहे ती यासाठी महत्वाची आहे की मुलाला सहजपणे ते पुस्तक हातात घेऊन वाचता, पाहता येईल का हे ही पहावे.
बऱ्याचदा किंमत जास्त असली तरी पाने कमी असतात. अशा वेळी त्यात रंगीत चित्रे अधिक प्रमाणात असतात अशा वेळी केवळ त्यातील गोष्टी न वाचता विविध प्रकारच्या चित्रांमधून, रंगांमधून मुलांशी संवाद साधावा. मुलांना ती चित्रे काढण्यास वाव द्यावा. मुलांचा कागदाशी जितका स्पर्श वाढेल तेवढे ते त्याच्या जास्त जवळ जातील.
बहुतेक सगळ्याच पुस्तकांची पानांची संख्या दिलेली आहे. तुमच्या पाल्याच्या वाचनाची जर सुरवात असेल तर कमी पानांची पुस्तके मुलांसाठी घ्या. पुस्तक वाचून संपवल्याचा आनंद त्यांना दुसरे पुस्तक हातात घेण्यास उद्युक्त करेल.
बऱ्याचदा केवळ वाचत बसणे मुलांसाठी कंटाळवाणे असते तेव्हा त्यांना चित्रे, शब्दकोडी, अॅक्टिविटी बुक्स अशी पुस्तके हातात द्या.
‘मला बोर होतंय. काय करू?’ या आजकालच्या सगळ्यात ज्वलंत प्रश्नावरचा उपाय पुस्तके आहेत मात्र त्यांना सातत्याने पुस्तकांच्या सोबत वावरण्याची संधी द्या, त्यांना वाचताना सोबत करा. तुमच्या पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद जेव्हा मुलांना तुमच्या चेहऱ्यावर दिसेल तेव्हाच त्यांना पुस्तके जवळची वाटू लागतील.
अप्रतिम कामगिरी वैभवी .
तुझी हि कामगिरी पाहून खुप छान वाटले.
अशा वेगळाच विचार करून इतरांना ही वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुम्हा उभयतांचे अभिनंदन.
खूप धन्यवाद बाई!पुस्तकांची आवड निर्माण केल्याबद्दल शाळेचे आणि तुम्हां सर्व शिक्षकांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
बालवाचक निर्माण करणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं ही बालकांना आणि पर्यायानं समाजाला समृद्धीकडे नेणारी गोष्ट आहे. आमच्यासारख्यांच्या केवळ विचारात असणारी ही सदिच्छा तुम्ही प्रत्यक्ष कृतीत आणलीत म्हणून मनःपूर्वक खूप अभिनंदन! पुस्तकं हाताळणाऱ्या, गोष्टी वाचणाऱ्या बालकांतून पुढे गोष्टी सांगणारी आणि लिहिणारी अनेकानेक व्यक्तिमत्त्व घडोत ही सदिच्छा! आणि ह्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तुम्हाला, पुस्तकांचा पसारा व्यापक होवो ही शुभेच्छा! 💐
मनःपूर्वक धन्यवाद मेघना ताई 🙏 आज तंत्रज्ञानाचे बरेच पर्याय आपल्याला उपलब्ध असल्याने त्याचा योग्य वापर करून पुस्तके आणि लहान मुलं यातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासारखे जागरूक आणि उत्साही पालक यांच्या स्नेहसदिच्छा उमेद वाढवतात. Website नक्की share करा म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पुस्तकं पोहचवता येतील. ❤️