कानपिळे मास्तरांनी कवितेची पहिली ओळ गाऊन म्हंटली ती अशी: “आनंदी आनं दगडे SS”. त्यांची ओळ गाऊन झाल्यावर आम्ही मुलांनी ती म्हटली. अगदी ‘दगडे’ सकट म्हटली! मग मास्तरांनी कवितेचा अर्थ सांगितला आणि कवितेवर आम्हाला प्रश्न विचारले. ज्यांना उत्तरे देता आली नाहीत, त्यांच्या पाठीत धपाटा घालून त्यांचे कान पिळले! धपाटा खाणाऱ्या आणि कान पिळून घेणाऱ्या मुलात मी स्वतः होतो!! शाळेतून परत जाताना आनंदी आनंद घेऊन जाण्याऐवजी, पाठीवरचा धपाटा आणि दुखणारा कान घेऊन मी घरी आलो!
महिन्याभराने कानपिळे मास्तरांची बदली झाली आणि त्यांच्या जागी पंचमुखे नावाचे नवीन मास्तर आले. त्यांनी आनंदी आनंद गडे ही कविता पुन्हा शिकवायला घेतली. “मला ही कविता फार आवडते” हे पंचमुखे मास्तरांचे शब्द ऐकून मला आश्चर्यच वाटले. कविता ही अभ्यासाला असते, तिच्यावर प्रश्न विचारले जातात, प्रश्नांची तोंडपाठ उत्तरे लिहिली की परीक्षेत चांगले मार्क मिळतात- हे सगळे मला ठाऊक होते.
मात्र पंचमुखे मास्तरांनी कविता प्रथम गाऊन दाखवली. मास्तरांचा आवाज गोड होता. ते तल्लीन होऊन कविता म्हणत होते. मग त्यांनी ती कविता शिकवली. त्यांनी ती कविता इतकी छान शिकवली की त्या कवितेतल्या सुंदर सुंदर कल्पना माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. कवितेतला आनंदी आनंद माझ्या मनात निर्माण झाला होता. कविता शिकवून झाल्यावर पंचमुखे मास्तरांनी परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी विचारतात तसे प्रश्न विचारले नाहीत! त्यांनी फक्त इतकेच आम्हाला विचारले, “कविता आवडली? आनंद वाटला”
एका क्षणाचाही उशीर न करता आम्ही सगळी मुले आनंदाने ओरडलो, “होSSय!” आमच्या होय मध्ये बालकवींची ती ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता जणू काही भरून राहिली होती!!
‘झुले भाई झुला’ या पुस्तकातल्या कवितांच्या निमित्ताने त्या गोष्टीची आठवण झाली. अनेक लोक मला प्रश्न विचारतात: “तुम्ही मुलांसाठी कविता का लिहिता? ” त्यांच्या प्रश्नाला माझे असे उत्तर असते: “कविता लिहिताना, कविता वाचताना, कविता स्वतःशी गुणगुणताना मला अतिशय आनंद होतो. तसा आनंद मुलांना देता यावा म्हणून मी त्यांच्यासाठी या कविता लिहितो!!”
या कविता वाचून झाल्यावर मी मुलांना त्याच्यावर कसलाही प्रश्न विचारणार नाही. पंचमुखे मास्तरांनी आम्हाला विचारलेला एकच प्रश्न मात्र सगळ्या मुलांना मी विचारेन: “कविता आवडल्या? आनंद वाटला?”
सगळ्या मुलांनी आनंदाने इतकेच उत्तर द्यावे:
“होSSSय!!”
– मंगेश पाडगावकर